२६ एप्रिल रोजी मतदान; १६ हजार ५८९ मतदान केंद्र

मुंबई:- महाराष्ट्रात लोकसभा सार्वत्रिक निवडणुकीच्या पहिल्या टप्प्यात विदर्भांतील रामटेक, नागपूर, भंडारा-गोंदिया, गडचिरोलीचिमूर, चंद्रपूर या पाच लोकसभा मतदार संघामध्ये दि. १९ एप्रिल रोजी मतदान घेण्यात आले. त्यामध्ये मतदारांनी चांगला सहभाग नोंदवत मतदान केले असून निर्भय आणि शांततापूर्ण वातावरणात मतदान प्रक्रिया पार पडली आहे. दुसऱ्या टप्प्यातील २६ एप्रिल रोजी होत असलेल्या मतदानासाठी यंत्रणा सज्ज असल्याची माहिती मुख्य निवडणूक अधिकारी तथा प्रधान सचिव एस. चोक्कलिंगम यांनी दिली. मंत्रालयात आयोजित पत्रकार परिषदेत श्री. चोक्कलिंगम बोलत होते. यावेळी अतिरिक्त मुख्य निवडणूक अधिकारी डॉ. किरण कुलकर्णीं उपस्थित होते. यावेळी माहिती देताना श्री. चोक्कलिंगम म्हणाले, दुसऱ्या टप्प्यात विदर्भ व मराठवाड्यातील बुलढाणा, अकोला, अमरावती, वर्धा, यवतमाळ-वाशिम, हिंगोली, नांदेड, परभणी या ८ लोकसभा मतदार संघामध्ये २६ एप्रिल रोजी मतदान होणार आहे.

यासाठी एकूण १६,५८९ मतदान केंद्रांची सुविधा उपलब्ध करुन देण्यात आली असून या निवडणुकीत १ कोटी ४९ लाख २५ हजार ९१२ मतदार आपला मतदानाचा हक्क बजावणार आहे. यामध्ये इटीपीबीएसद्वारे १८,४७१ सेवा मतदार मतदानाचा हक्क बजावणार आहेत. तर १२ डी अर्जाद्वारे ८५ वर्षावरील व दिव्यांग असे एकूण १४,६१२ मतदार मतदान करणार आहेत. या आठ मतदार संघासाठी बॅलेट युनिट (बीयु) ३७,४०३ तर कंट्रोल युनिट (सीयु) १६,५८९ आणि १६,५८९ व्हीव्हीपॅट उपलब्ध असून दुसऱ्या टप्प्यात एकूण २०४ उमेदवार निवडणूक लढविणार असल्याची माहिती त्यांनी दिली. या निवडणुकीसाठी लागणारे साहित्य, साधनसामग्री मतदान केंद्रावर पुरवण्यात आलेली आहे. निवडणूक सुरळीत पार पाडण्यासाठी पुरेसे प्रशिक्षित मतदार कर्मचारी व अधिकारीवर्ग उपलब्ध आहेत. तसेच पोलीस कर्मचारी तैनात ठेवण्यात आले आहे. या मनुष्यबळाचे रॅण्डमायझेशन करुन त्यांच्या सेवा उपलब्ध करुन दिल्या आहेत. या निवडणूक प्रक्रियेसाठी यंत्रणा पूर्ण तयारीनिशी निवडणुकीसाठी सज्ज असून मतदानाचा टक्का वाढविण्यासाठी सर्व मतदारांनी जास्तीत जास्त संख्येने मतदानकरावे, असे आवाहन श्री. चोक्कलिंगम यांनी यावेळी केले.