काँग्रेसने सांगलीची जागा सोडलेली नाही, वेळ पडल्यास कोणत्याही लढाईसाठी तयार, विशाल पाटलांसाठी विश्वजीत कदम आक्रमक

नवी दिल्ली:- सांगली लोकसभेच्या जागेवरुन महाविकास आघाडीत निर्माण झालेला तिढा अद्याप सुटलेला नाही. ठाकरे गटाकडून बुधवारी प्रसिद्ध करण्यात आलेल्या उमेदवार यादीत सांगलीतून चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा करण्यात आली होती. परंतु, काँग्रेस पक्ष सांगलीची जागा ठाकरे गटासाठी सोडायला तयार नाही. त्यासाठी काँग्रेस नेते विश्वजीत कदम आणि इच्छूक उमेद्वार विशाल पाटील यांनी बुधवारी थेट दिल्लीत जाऊन पक्षाचे अध्यक्ष मल्लिकार्जून खरगे यांची भेट घेतली. यावेळी विश्वजीत कदम यांनी आक्रमक भूमिका घेत सांगलीची जागा काँग्रेसचीच आहे, असे ठणकावून सांगितले. गेल्या काही महिन्यांपासून काँग्रेसचे विशाल पाटील हे सांगलीतून लोकसभा निवडणूक लढवण्यासाठी तयारी करत होते.सांगलीचा पुढचा खासदार विशाल पाटील हेच असतील, अशी खात्रीही अनेकांना होती. मात्र उद्धव ठाकरे यांनी सांगलीच्या जागेसाठी परस्पर चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केली होती. बुधवारी ठाकरे गटाने प्रसिद्ध केलेल्या उमेद्वार यादीत सांगलीच्या जागेसाठी चंद्रहार पाटील यांचेच नाव होते. परंतु, काँग्रेस पक्ष ही जागा सोडायला तयार नाही. उद्धव ठाकरे यांनी चंद्रहार पाटील यांच्या नावाची घोषणा केल्यानंतर काँग्रेसचे प्रमुख नेते नाराज झाले होते. त्यांच्या या नाराजीला न जुमानता ठाकरे गटाच्या उमेदवारी यादीतही सांगलीसाठी चंद्रहार पाटील यांनाच उमेदवारी दिल्याने हा वाद चिघळला आहे.