देवेंद्र काळे यांच्या मृत्यूस जबाबदार टिप्परचा शोध घेण्यास पोलिसांची टाळाटाळ

दै. लोकजन वृत्तसेवा भंडारा :- मुजबी ते शिंगोरी हया महामार्गावरील बायपासचे काम सुरू असले तरी लहान- मोठे अपघात, ट्राफीक जाम ही नित्याचीच बाब बनलेली आहे. अशातच दिनांक २ एप्रिलच्या रात्री अंदाजे ८.१५ वाजता देवेंद्र काळे रा. कोलारी हयांच्या मोटार सायकलला दवडीपार फाट्याजवळ ओव्हरटेक करीत असतांनी एका टिप्पर चालकाने धडक दिली. यात देवेंद्र काळे हे जागीच मृत्यू पावले तर सोबत असलेले प्रकाश तितीरमारे हे गंभीर झाले असतांना टिप्पर चालक पळून गेला. हया घटनेला २० दिवस लोटुनही अजुनपर्यंत भंडारा पोलीस प्रशासनाला टिप्परचा शोध घेता येवू शकले नाही. हे पोलिसांचे अपयश आहे. तात्काळ टिप्परचा शोध न घेतल्यास तीव्र आंदोलनकरण्यात येईल, असा इशारा शिवसेना (उ.बा.ठा.) चे जिल्हा प्रमुख संजय रेहपाडे यांनी दिला आहे. ही धडक इतकी जबरदस्त होती की, धडक दिल्यानंतर मोटार सायकल टिप्परमध्ये फसून दवडीपार फाट्यापासून महात्मा फुले कॉलनीपर्यंत रस्त्यावर घासत घासत आली. रोडवरील घर्षनाने मोटार सायकल ने पेट घेतला. तरीसुध्दा टिप्पर चालकाने टिप्पर न थांबविता आपले टिप्पर भरधाव वेगाने भंडाराच्या दिशेने घेवून पळाला. परंतु महात्मा फुले कॉलनीजवळ मोटारसायकल आपोआप टिप्पर मधून बाहेर निघाली आणि हायवेवर जळत राहिली.

अपघात स्थळापासून मोटार सायकल जळत असलेल्या ठिकाणापर्यंत हायवेवर अनेक हॉटेल, शोरूम व अन्य प्रतिष्ठाने आहेत. त्यांची सीसीटीव्ही फुटेजतपासली तर त्यात निळया रंगाच्या टिप्पर मध्ये मोटार सायकल फसून जाताना दिसत असतांनाही २० दिवसापासून सदर टिप्परचा शोध न लागणे हे न समजण्यापलिकडे आहे. अपघात झाल्यानंतर अपघात स्थळापासून जवळपास अर्धा किलोमीटर पर्यंत मोटार सायकल टिप्पर सोबत ओढत नेणे हया वरून ट्रक चालक एकतर मद्यधुंद अवस्थेत होता किंवा अत्यंत निर्दयी होता. परंतू हया अपघातामुळे देवेंद्र काळे हयाच्या पश्चात त्याचे म्हातारे आईवडील, पत्नी, दोन मुली, एक मुलगा हयांच्या जगण्याचा आधार गमविल्यामुळे संपूर्ण कुटुंब उघड्यावर पडले आहे, मुलाबाळांचे भविष्य अडचणीत आले आहे. हया अपघातामध्ये जखमी पोलीस पाटील प्रकाश तितीरमारे हयाचे अजुनपर्यंत साधे बयान सुध्दा घेण्यात आलेले नाही. हयावरून तपासावर संशय घेण्यास वाव मिळतो. त्यामुळे अपघातास कारणीभूत ठरलेल्या टिप्परचा शोध पोलीस प्रशासनाने लवकरात लवकर घ्यावा. गरज पडल्यास स्थानिक गुन्हे शाखेकडे हयाचा तपास वर्ग करावा. आठ दिवसात या टिप्पर चालकाचा शोध घेवून योग्य ती कार्यवाही न झाल्यास मृत देवेंद्र काळे हयाचे कुटुंबियांना घेवून शिवसेना आंदोलनाच्या पवित्र्यात असेल याची प्रशासनाने दखल घ्यावी, असा इशारा शिवसेना (उ. बा. ठा.) चे जिल्हाप्रमुख संजय रेहपाडे यांनी निवेदनातून दिला आहे.