गोंदिया जिल्ह्याला पुन्हा अवकाळी पावसाचा तडाखा

 गोंदिया:- अवकाळी पावसाने काढता पाय घेतला असे वाटत असतानाच पुन्हा राज्यात आणि गोंदिया जिल्ह्यात हा पाऊस परतून आला आहे. तीन दिवसांपूवर्ी जिल्ह्याचा तापमान ४२ अंश सेल्सिअसवर पोहोचले होते. तर अवकाळी पावसाने ते पुन्हा कमी झाले आहे. दरम्यान, उकाड्यात प्रचंड वाढ झाली आहे. भारतीय हवामान खात्याने उपराजधानीसह काही शहरांना आज अवकाळीचा इशारा दिला आहे. आज पहाटेपासूनच गोंदिया जिल्ह्यात विजांचा कडकडाट आणि ढगांचा गडगडाट सुरू आहे.अधूनमधून पावसाच्या सरी कोसळत आहेत.रविवारी देखील पावसाने हजेरी लावली. तर सोमवारी मात्र आकाश पूर्णपणे ढगांनी काळवंडले आहे. पाच दिवसांचा प्रचंड उष्णतेनंतर पुन्हा पाऊस सुरू झाला आहे. दक्षिण भारतात “सायकलोनिक सर्क्युलेशन’ तयार झाल्यामुळे पुढील दोन दिवस ढगाळ वातावरण व पाऊस पडण्याचा अंदाज प्रादेशिक हवामान खात्याने वर्तवला आहे. दक्षिण छत्तीसगडपासून दक्षिण तामिळनाडूपर्यंत हवेचा कमी दाबाचा पट्टा सक्रिय आहे. त्यामुळे पावसाची शक्यता वर्तवण्यात आली आहे. विदर्भ, मराठवाड्यात पावसाचा इशारा असला तरी मुंबई आणि कोकण किनारपट्टीला उष्णतेचा जाच सहन करावा लागणार आहे. मात्र,हवामान खात्याने राज्यात वादळी वाऱ्यासह पावसाचा तडाखा सुरूच असणार आहे, अशी शक्यता वर्तवली आहे. विदर्भात वादळी पाऊस, गारपिटी तर मध्य महाराष्ट्र, मराठवाड्यात वादळी वारे, विजांसह पावसाचा इशारा देण्यात आला आहे. नागपूरसह अमरावती, वर्धा, यवतमाळ, सोलापूर, धाराशिव, बीड, लातूर, बुलढाणा, अकोला, वाशिम, भंडारा, गोंदिया, चंद्रपूर, गडचिरोली या जिल्ह्यात यलो अलर्ट देण्यात आला आहे.