वादळ अवकाळी पावसाने धानपीक अक्षरशः जमीनदोस्त झाले

दै. लोकजन वृत्तसेवा तुमसर :- हलक्या प्रतीचे धान पीक कापणीला आले आहे. हे धान शेतात जमीनदोस्त झाल्याने शेतकऱ्यांचे मोठे नुकसान झाले आहे. भारी प्रतीच्या धानाचे नुकसान झाले आहे. दुसऱ्यांदा अवकाळी व वादळाने परिसरात भीषण तांडव केले असल्याने शासनाने सर्वेक्षण करण्याची ओरड सुरू झाली आहे. धान पिकांचे नुकसानग्रस्त शेतकरी, गावातील नुकसानग्रस्तांना तातडीने आर्थिक मदत देण्याची मागणी शिवसेनेचे विभाग प्रमुख तथा स्वराज्य युवा एकता फाउंडेशनचे संस्थापक अध्यक्ष अमित एच मेश्राम यांनी उपविभागीय अधिकारी तथा तहसीलदारांकडे निवेदनाद्वारे केली आहे. मंगळवारी रात्रीला आलेल्या वादळी वाऱ्यासह अवकाळी पावसाने शेतकऱ्यांचा पुन्हा एकदा घात केला आहे. अवकाळीनेधानपिकाला मोठा फटका बसला असून शेतकरी अडचणीत आले आहेत. तात्काळ पंचनामे करुन मदतीची मागणी होत आहे. अवकाळी पाऊस शेतकऱ्यांचा मागे पडला आहे. एक-दोन महिने जात नाही तर अवकाळी पाऊस येतो. आणि शेतकऱ्यांच्या उभ्या पिकांना उद्ध्वस्त करून जातो. आता कापणीसाठी तयार होत असलेला उन्हाळी धान अवकाळी पावसाचा तडाख्यात सापडला. रोगराई व अन्य संकटातून जरी पिकांना वाचविता आले तरी नैसर्गिक आपदापासून शक्य होत नाही, हेच खरे आहे. वादळ आणि गारपिटीमुळे धानाचे लॉब गळून पडले. तालुक्यातील शेतकऱ्यांनी झालेल्या नुकसानीबाबत शिवसेनेच्या माध्यमातून प्रशासनाकडे निवेदन दिले आहे. परंतु पंचनामे करण्यास प्रशासनाकडून दिरंगाई होत असल्याने पवनारा, बघेडा, कारली, चिचोली या क्षेत्रातील शेतकऱ्यांकडून नाराजी व्यक्त केली जात आहे.